Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


ज्वालामुखीचा उद्रेक

ज्वालामुखीचा उद्रेक

आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग टणक आणि स्थिर वाटला तरी हे धरतीचं कवच अनेक खंडांमध्ये विभागलं गेलेलं आहे. हे खंड पृथ्वीच्या पोटात असलेल्या द्रव पदार्थावर तरंगत असतात. पृथ्वीच्या गाभ्यामधलं तापमान अतिशय चढं असतं. त्यापायी तिथले कातळ, दगड वितळतात आणि त्यांचं द्रवरूप मॅग्मामध्ये रूपांतर होतं. हा मॅग्माही अतिशय तप्त अवस्थेत असतो. त्यापायी त्याचा दबाव वरच्या खंडांवर पडत असतो. ज्या वेळी हा दबाव एका मर्यादेपलीकडे जातो तेव्हा तो मॅग्मा वरवर चढू लागतो. ज्वालामुखीच्या पोटातल्या या मॅग्माला वर चढण्यासाठी एक नळीसारखी मोकळी जागा सापडते. हिलाच व्हेन्ट म्हणतात. व्हेंटचं वरचं टोक ज्वालामुखीच्या उघड्या तोंडाशी जोडलेलं असतं. हा तापलेला मॅग्मा वरवर चढत असताना वाटेत आलेल्या खडकांनाही वितळवतो. त्यामुळे त्यांचं प्रमाण व दबाव वाढत जातो. वरवर जातानाच त्याचं लाव्हामध्ये रूपांतर होतं. हा लाव्हा त्या मुखाशी पोचला की जोराने बाहेर फेकला जातो. यालाच ज्वालामुखीचा उद्रेक म्हणतात. असा स्फोट झाल्यासारखा उद्रेक झाला की राख, धूळ आणि न वितळलेले खडकांचे तुकडे वातावरणात उंच फेकले जातात. राख व खडक परत जमिनीकडे ओढले जातात. पण बाहेर पडलेला लाव्हा मात्र द्रवरूप असल्यामुळे बहुतेक वेळा ज्वालामुखीच्या बाहेरच्या बाजुवरून ओघळत खाली उतरतो. त्याचा वेग जास्त असला तर तो झपाट्याने आसपासच्या प्रदेशात पसरतो. वाटेत आलेल्या सगळ्यालाच वितळवत, जाळत तो दूरदूरवर पसरत जातो. पुरातन पॉम्पे शहराजवळच्या व्हेसुव्हियस या ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा ते सर्व शहर बेचिराख होऊन त्या लाव्हाखाली गाडलं गेलं होतं. हा लाव्हा जसा थंड होतो तसं त्याचं अग्निजन्य खडकांमध्ये रूपांतर होतं. जर उद्रेक झालेला ज्वालामुखी सागराच्या पोटात असेल तर अशा थंड झालेल्या लाव्हापासून बेटं तयार होतात. हवाई बेटांचा उगम असा झाला आहे.

ज्वालामुखीचा उद्रेक एकाएकी काहीही पूर्वसूचना न देता होऊ शकतो. पण उद्रेक होण्यासाठी पुरेसा मॅग्मा तयार होऊन व्हेन्टवाटे वरवर चढत जाण्याची आवश्यकता असते. ते होण्यासाठी काही कालावधी निश्चितच जातो. त्यामुळे काही पूर्वसूचना मिळू शकतात. त्यातल्या बहुतेक भूकंपाच्या छोट्या छोट्या धक्क्यांच्या स्वरूपातल्या असतात. तर काही वेळा तापलेल्या मॅग्माच्या हालचालीमुळे जमिनीचं तापमान वाढत जातं किंवा तिथं असलेल्या तसेच गरम पाण्याच्या झऱ्यांचं तापमानही वाढत जातं. काही वेळा जमिनीला फुगवटाही येतो. पण या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी संवेदनशील उपकरणांची गरज असते. सुप्त ज्वालामुखींच्या आसपासच्या प्रदेशात ठेवलेल्या अशा उपकरणांद्वारे पूर्वसूचना मिळाल्यास तेथील नागरिकांचं स्थलांतर करून जीवितहानी टाळता येते.

##  संकलित ##
Tricks and Tips Tricks and Tips