Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


मार्क म्हणजे गुणवत्ता नाही






अतिशय सुरेख आणि सूज्ञ पालकांसाठी डोळे उघडणारा झणझणीत लेख:

'मार्क'म्हणजेच गुणवत्ता नाही!

डॉ. अरुण नाईक,
(मानसोपचारतज्ञ) -


नुकतीच एक बातमी वाचली....
नेहमी चांगले मार्क मिळवणाऱ्या मुलीला दहावीचा पहिला पेपर चांगला नाही गेला. संध्याकाळी तिने आत्महत्या केली. अजून परीक्षाही संपली नाही. पण मुलगी संपली.

मागे एका मेडिकलच्या विद्यार्थ्यांने शेवटच्या वर्षांला गोल्ड मेडल ऐवजी सिल्वर मेडल मिळाले, म्हणून आत्महत्या केली होती. माणूस मरायला घाबरत नाही, पण किंमतशुन्य जगायला घाबरतो.

एका नामांकित शाळेच्या स्कॉलर वर्गातील मुलांशी बोलताना मी त्यांना विचारले की, "सर्वजण त्यांना काय म्हणतात?"
मुले म्हणाली, की 'स्कॉलर'.
मी विचारले 'का?',
मुले म्हणाली, "कारण आम्हाला चांगले मार्क मिळतात."
मी समीकरण मांडले.
'अ = ब'

'ब = क'
त्याअर्थी 'अ = क'.
म्हणजेच,
'मी = स्कॉलर'

'स्कॉलर = मार्क'.
याचा
अर्थ 'मी = मार्क'.

जेव्हा आपण आपली किंमत मार्कांवरून करायला लागतो, तेव्हा जरा मार्क कमी मिळाले की, आपली किंमत कमी झाली असे वाटते.

सर्व परीक्षा बोर्डानी मार्क वाटायला सुरुवात केल्यापासून तर हे समीकरण पालक व मुले यांच्या डोक्यात गच्च बसायला लागले आहे.

हे धोकादायक आहे....

माझी भाची शाळेतही जात नसताना तिने काढलेल्या एका चित्राला मी 'वा' म्हटले. ती लगेच म्हणाली-मार्क दे.
मी चित्राच्या बाजूला लिहिले 'छान'.
ती म्हणाली मार्क दे. शंभरपैकी.
अडूनच बसली.

शाळेत जायच्या आधीपासूनच हे डोक्यात शिरत आहे. हे आजूबाजूच्या वातावरणात आहे. या विषारी वातावरणाने वरील बळी घेतले आहेत.

जेव्हा कधी पालकांना विचारले की, तुमच्या मुलांबाबत काय व्हावे असे तुम्हाला वाटते? तेव्हा
हमखास उत्तर येते की, तो चांगला नागरिक बनावा, चांगला माणूस बनावा.

जरा विरोधाभास पाहूया...

मेडिकलच्या विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी सांगितले की त्यांना चांगला डॉक्टर बनायचे आहे.
मी विचारले चांगला डॉक्टर कोणाला म्हणता?
तर मुले म्हणाली की, जो जास्तीत जास्त लोकांना चांगल्यात चांगला उपचार देऊन बरा करतो तो.

सिल्वर मेडल मिळालेल्या त्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांलाही चांगला डॉक्टर बनायचे असेल ना?
पण बनला का?
त्याच्या आधीच गेला.

चांगला नागरिक,
चांगला माणूस,
चांगला डॉक्टर,
चांगला व्यावसायिक...
आपण जेव्हा काहीतरी चांगले "करतो" तेव्हा बनतो. नुसत्या मार्कानी नाही बनत.

एका नववीतील मुलीला चाचणी परीक्षेत गणितात विसपैकी १४ मार्क मिळाले म्हणून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.

माझ्याशी बोलताना तिचे पहिले वाक्य होते की, 'आय एम युझलेस'.

या मुलीला दहावीनंतर क्रीडा पत्रकार बनायचे आहे. त्यासाठी ती कलाशाखेला जाणार आहे.

मी विचारले की आर्ट्सला गणित असते का?
ती म्हणाली 'नाही'.
मी म्हटले की याचा अर्थ तू दहावी नंतर गणिताला टाटा करणार,मग तू गणितासाठी जीव का देत होतीस?
 हे ऐकल्यावर तिलाही हसू आले.

काय आहे की 'गुणी मुलगी',
'भावंडात हुशार मुलगी',
'सर्वाची आवडती',
'९०% मिळायला हवेत हं'. या इतरांच्या
मनातील प्रतिमेला जपण्याचे तिला दडपण आले होते.

ही प्रतिमा आपण जपू शकलो नाही तर आपण युझलेस....!

मुलांमध्ये खूप क्षमता असते,
परंतु मार्कावर लक्ष केंद्रित
केल्यामुळे त्या क्षमतांना
'किंमत' दिली जात नाही.

आज जग जवळ आले आहे. अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.
पालकांनी लक्षात घ्या की, हे "आपल्या" लक्षात न आल्यामुळे जेव्हा मुलांना कमी मार्क मिळतात तेव्हा "आपण" नकळत हिंसक होतो. मुलांच्या आत्मविश्वासावर घाला घालतो.

मार्कावरून मुलांची किंमत किंवा लायकी ठरवू नका. आपण जन्माला आलो ही एकच गोष्ट आपण जगायला लायक आहोत यासाठी पुरेशी आहे. आता जगतांना काय करायचे याचा विचार करूया.


        🌏 संकलित  🌏
Tricks and Tips Tricks and Tips