Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


आपल्याला वस्तू केव्हा दिसते ?

आपल्याला वस्तू केव्हा दिसते ?

ज्या क्षणी आपली नजर त्या वस्तूवर पडते त्या क्षणी ती आपल्याला दिसते, खरं ना ? तसं नसतं तर जगभरातल्या अनेक बऱयावाईट घटनांचा लाइव्ह म्हणजेच तात्काळ चित्रीकरण आपल्याला दाखवण्याची अहमहमिका निरनिराळ्या टीव्ही वाहिन्यांमध्ये कशाला लागली असती ? पण जरा सबूर. अशी घाई करण्यापूर्वी आपल्याला एखादी वस्तू दिसते म्हणजे नेमकं काय होतं याचा विचार करूया.

 आपल्या समोरच्या वस्तूपासून निघालेले प्रकाशकिरण आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतात. डोळ्यातल्या भिंगांकडून त्यांचं केंद्रीकरण होऊन ते पाठच्या पडद्यावर पडतात. तिथल्या शंकू आणि काष्ठ पेशींकडून ते किरण शोषले जातात. त्याचा परिणाम म्हणून तिथं एक विद्युतरासायनिक स्पंद निर्माण होतो आणि तो पडद्याला जोडलेल्या मज्जातंतूवरून विहरत विहरत मेंदूच्या दृष्टीचं नियंत्रण करणाऱ्या भागात पोहोचतो. तिथं त्या संदेशाचं विश्लेषण होतं. त्यातून मिळालेली माहिती स्मृतिकोषात ठेवून साठवून ठेवलेल्या माहितीशी पडताळून पाहिली जाते. आणि त्यानंतरच त्या वस्तूची ओळख पटते. ती वस्तू सर्वार्थानं आपल्याला दिसते. म्हणजेच आपली नजर त्या वस्तूवर पडल्यानंतर या भौतिक, रासायनिक आणि जैविक प्रक्रिया पार पडाव्या लागतात. त्यानंतरच ती वस्तू आपल्याला दिसते.

 यापैकी प्रकाशकिरण त्या वस्तूपासून आपल्या डोळ्यांच्या पडद्यापर्यंत पोहोचण्यासाठी सेकंदाला तीन लाख किलोमीटर या भन्नाट वेगाने मधलं अंतर पार करतात. त्यासाठी अतिशय कमी वेळ लागत असला तरी निश्चित कालावधी नक्कीच लागतो. तो सूक्ष्मातिसूक्ष्म असेल पण शून्य असू शकत नाही. त्यानंतरच्या जैविक प्रक्रियाही जवळजवळ त्याच वेगाने पार पडतात. त्यालाही काही निश्चित कालावधी लागतोच. म्हणजेच त्या वस्तूकडे आपली नजर गेल्यापासून आपलं काही अब्जांश किंवा दश कोट्यांश सेकंदांच्या कालावधीनंतर ती वस्तू आपल्याला दिसते. आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या कालगणनेच्या तुलनेत हा कालावधी नगण्य वाटला तरी तो शून्य नसतो.
 आणि ही झाली पृथ्वीतलावरच्या वस्तूंची गोष्ट. त्या पलीकडच्या अंतराळातल्या गोलांचं काय ? त्याही आपण साध्या डोळ्यांनी पाहू शकतो. चंद्र आपल्यापासून ३,८०,००० किलोमीटर अंतरावर आहे. त्याच्यावरून परावर्तित झालेला सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोचण्यासाठी एका सेकंदाचा वेळ लागतो. सूर्य तर त्याहूनही दूर आहे. त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोचण्यासाठी तब्बल आठ मिनिटं लागतात. म्हणजेच आपल्याला जो सूर्य दिसतो तो आठ मिनिटांपूर्वीच असतो.
 आणि इतर तारे ते तर अब्जावधी योजनं दूर असतात. त्यातल्या काहींचा प्रकाश त्याच्या सुसाट वेगानेही आपल्यापर्यंत पोचण्यासाठी काही वर्षे लागू शकतात. म्हणजे ते तारे तेवढी प्रकाशवर्ष दूर असतात. काही तर इतके दूर आहेत की त्यांच्यापासून आपल्यापर्यंत पोहोचणारे किरण या विश्वाचा जन्म झाला त्याच वेळी त्यांच्यापासून निघालेले आहेत. ते तारे कदाचित आतापर्यंत विझूनही गेले असतील.

साभार :
'केव्हा ?' या पुस्तकातून
लेखक - बाळ फोंडके
Tricks and Tips Tricks and Tips