मल्लखांब अथवा मलखांब हा एक व्यायाम प्रकार आहे. हा एक कसरतींचा खेळ प्रकारही आहे. मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत सराव करण्यास मल्लखांब वापरला जातो. हा कुस्तीला पूरक व्यायामप्रकार आहे
कमीतकमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातील एकमेव क्रीडा प्रकार असे मल्लखांब खेळाचे वर्णन केले जाते.
इतिहास
मल्लखांब खेळाचा इतिहास अतिशय प्राचीन आहे असे मानले जाते. परंतु लिखित स्वरूपात हा फारसा आढळत नाही. रामायणकाळात हनुमंतानी मल्लखांबाचा शोध लावला असे सांगितले जाते. सोमेश्वर चालुक्याने सन ११३५ मध्ये लिहिलेल्या ‘मानसोल्लास’ या ग्रंथात मल्लखांब खेळाचे वर्णन आढळते.ओडिशा राज्यातील प्रसिद्ध जगन्नाथपुरीच्याप्राचीन मंदिराजवळ पंधराव्या शतकात जगन्नाथ वल्लभ आखाडा सुरू झाला. येथे स्थापनेपासून मल्लखांब प्रशिक्षण वंशपरंपरेने सुरू आहे. महाराष्ट्रात या खेळाची नोंद पेशवेकालावधी नंतर मोठ्या प्रमाणात आढळते. पेशव्यांनी देशभरात कुस्तीचे आखाडे सुरू केले. या आखाड्यांमध्येच त्यांनी मल्लखांबांचीही स्थापना केली. गुराखी समाजात मलखांबाचे महत्त्व मोठे आहे.
बाळंभट देवधर
दुसर्या बाजीरावाच्या काळातील मल्लखांब या खेळाचे आद्यगुरू म्हणून बाळंभट देवधर(जन्म : इ.स. १७८०; मृत्यू : इ.स. १८५२) यांचे नाव घेतले जाते. मीनल बाठे यांनी ‘एक होता बाळंभट’ नावाचे बाळंभटांचे चरित्र लिहिले आहे. त्या पुस्तकात मल्लखांबाचा इतिहासही आला आहे. बडोदा येथील दत्तात्रेय करंदीकर यांच्या व्यायामकोशाचा ३रा खंड इ.स. १९३२मध्ये प्रकाशित झाला. या खंदात बाळंभट देवधरांचे मल्लखांबाचे आद्यगुरू म्हणून उल्लेख आहे. महाराष्ट्राबाहेर उज्जैनआखाडा, झांशी व ग्वाल्हेर आखाड्यांचे स्मृतिअंक, वाराणसी येथील व्यायाम नावाचे मासिकात बाळंभटांपासून सुरू झालेली व्यायाम परंपरा आणि मल्लखांब यांचा उल्लेख आहे. गुजराथमध्ये आजही मल्लखांब असलेली आखाडे आहेत.
मराठी माणसाने देशभरात मल्लखांबाला लोकमान्यता मिळवून दिली. बाळंभट देवधरांच्या या चरित्रपुस्तकात मल्लखांब खेळासंबंधात चार पिढ्यांचा इतिहास आला आहे. इतिहास संशोधक डॉ. सदाशिव शिवदे यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे.बडोदा, मिरज आणि वाराणसी येथे सापडलेले ग्रंथ, कागदपत्रे, आखाड्यांची इतिवृत्ते यांच्या आधारे हा चरित्र ग्रंथ लिहिणे शक्य झाले
== संकलित ==
== संकलित ==