Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


रद्दितून, ज्ञानवृध्दी





  “ रद्दीतून ज्ञानवृद्धी “

विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे विविध दालन उपलब्ध करून देणे, वाचन क्षमता व वाचन कौशल्य निर्माण करणे, मराठी भाषेचा वसा जोपासणे, जगातील ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, चालू घडामोडीबद्दल समरस होणे, ज्ञानाचा खजिना अध्ययन प्रक्रियेत वापरणे व पुढील पिढ्यांपर्यंत वाचनाचा ठेवा हस्तांतरित करणे हाच मुख्य ध्यास ठेऊन मराठीची अस्मिता जोपासण्याचे कार्य “ रद्दीतून ज्ञानवृद्धी “
या मराठी विषयाच्या उपक्रमातून साध्य होण्यास नक्कीच मदत होते.”
                               शिक्षण प्रवाहात  विद्यार्थ्यांना आपलंस करून ज्ञानार्जन करणे  हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर सदैव असतो. विद्यार्थ्यांनाच आपले ध्येय समजून, त्यांच्यात अपेक्षित बदल घडविण्याकरिता सतत धडपड सुरु असते. वाचन ही जीवनाला उन्नत करणारी बाब असून त्यामुळे बुद्धीची मशागत होते. त्यातल्या त्यात माणसाचे जीवन फुलविन्यात वाचनाचा महत्वाचा वाटा.....  त्याचप्रमाणे ज्ञानाच्या अथांग महासागरात स्वच्छंद विहार करण्यासाठी वाचनकला महत्वाची. अध्यापनातील मरगळ दूर करून आनंदाने, उत्साहाने, सतर्कतेने अध्यापन करण्याची जिज्ञासा मनात ठेऊन विद्यार्थ्यांमध्ये स्वयंअध्ययनाची सवय लागावी व त्यांचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे, वाचन एक अंग व्हावे, त्यामुळे वाचनाचे महत्व लक्षात घेऊन वाचन विकासाकरिता राबविलेल्या विविध उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणजे रद्दीतून ज्ञानवृद्धी.... 
         “ मुलांना वाचायला आवडत नाही...” हे वाक्यच जणू मोडीत काढायचा निश्चय करून विद्यार्थ्यांच्या मदतीने जुने रद्दीस्वरूपातील वर्तमानपत्रे गोळा करण्यात आली. दररोज ४ ते ५.३० या वेळेत वर्तमानपत्रातील ज्ञानात्मक व वाचनीय  कात्रणे कापून संदर्भानुसार वेगवेगळे करण्यात आले. स्व-कृतीतून विद्यार्थ्याच्या मदतीने   जवळपास ३२०० कात्रणे गोळा झालीत. कात्रणे विषयवार वेगवेगळे करण्यात आली. पुस्तके तयार करायचे म्हणजे कागद, सेन्चुरी पेपर, फेविकॉल, स्टेपलर पींस, इत्यादी साहित्य आलेच. हे सर्व साहित्य गोळा करण्यासाठी एका परिचयाच्या  झेरॉक्स सेंटरला भेट दिली असता त्यांना सदर उपक्रमाबद्दल माहिती सांगितली, त्यांनी या उपक्रमासाठी लागणारे सर्व साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले. उपलब्ध साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांच्या मदतीने विविध आकाराची  पुस्तके तयार करण्यात आले व विषयवार कात्रणे चिकटविण्यात आली. जवळपास ३०० चे वर पुस्तके तयार झाली. या पुस्तकांमध्ये ज्ञानसागर, बोधकथा, विचारजगत, वैज्ञानिक, वैचारिक, नीतीकथा, तंत्रज्ञानात्मक, बालसंस्कारात्मक, ऐतिहासिक, खगोलशास्त्र, धार्मिक, इत्यादी संदर्भनिहाय पुस्तके तयार झाली. स्वयंकृतीतून ज्ञानाचा सागर तयार केल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, ही बाब वाखाणण्याजोगी होती. या पुस्तकांचा वापर विद्यार्थी दररोज ४ ते ५.३० या वेळेत अवांतर वाचनासाठी करू लागली. पुस्तकांमध्ये १० ते १२ पानेच असल्यामुळे विद्यार्थी ती पुस्तके आनंदाने वाचू लागली. हा उपक्रम जुलै २०१५ ते एप्रिल २०१६ राबविण्यात आला. गेल्या दोन वर्षापासून  या पुस्तकांचा उपयोग परिपाठामध्ये कथाकथन, सामान्य ज्ञान, विविध बातम्या तसेच अवांतर वाचन  इत्यादीसाठी केला जात आहे. याचा फायदा असा झाला  की, विद्यार्थ्यांचा वाचनाकडे कल वाढला, वाचनाची गती वाढली, तसेच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. 
          विद्यार्थ्यांसाठी वाचन दालन उपलब्ध झाल्यामुळे, वाचन क्षमता व वाचन कौशल्य वृद्धिंगत झाले. या पुस्तकातील ज्ञानाचा खजिना अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत वापरून पुढील पिढ्यांपर्यंत वाचनाचा ठेवा हस्तांतरित करण्याचा ध्यास पुढे ठेऊन विद्यार्थी यशाच्या दिशेने पादाक्रांत करीत आहे.  आजच्या डिजिटल क्रांतीच्या युगात मुलांमध्ये वाचनाचे संस्कार रुजविणे हे निश्चितच जोखमीचे कार्य. विस्मृत होणारे अभिजात साहित्य टिकविण्यासाठी आणि ते पुढच्या पिढीत संक्रमित करण्याकरिता अश्या उपक्रमाची नितांत गरज आहे. शिवाय जुने ते सोने या उक्तीप्रमाणे वर्तमानपत्राच्या रद्दीतून विविध ज्ञानात्मक माहितीची कात्रणे गोळा करून त्याचा लाभ विद्यार्थ्यांसाठी अध्ययन-अध्यापन कार्यात करण्याचा हा प्रयत्न रद्दीतून ज्ञानवृद्धी या उपक्रमातून  यशस्वी झालेला आहे.  वर्तमानपत्रातील लेख व ज्ञानात्मक माहिती पुन्हा प्रकाशित होणे शक्य नसते. दिवसागणिक वाचनाच्या सवयीतून विद्यार्थ्यांची होत असलेली ज्ञानवृद्धी जणूकाही उपक्रमांचे यशस्वी फलितच आहे.  

श्री कमलेश तुकाराम सोनकुसळे (स. शिक्षक )
जि. प. उच्च प्राथ. केंद्र  शाळा, लिंगा
पं. स. काटोल, जि. प. नागपूर

7588691372...... 
email__ kamlesh1029@gmail.com
Website/blog –  www.kamlesh1029.blogspot.in
Youtube channel  –  kts1029

Tricks and Tips Tricks and Tips